जनसंवाद (पत्रकारिता) या विषयात ५ सुवर्णपदकांसह पदवी-पदव्युत्तर शिक्षण प्राप्त आशुतोष अडोणी नव्या
पिढीतील अभ्यासक आणि प्रभावी वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.
महाराष्ट्र,बृहन्महाराष्ट्र आणि विविध राज्यातील प्रतिष्ठित व्याख्यानमालांतून गेली २५ वर्षे ते
सातत्याने जनप्रबोधन करीत आहेत.
संत साहित्य,रामायण, महाभारतातील व्यक्तिरेखा, क्रांतिकारक,महापुरुष जीवनचरित्रे यावर अडोणी यांनी ६००
चे वर व्याख्याने आजवर दिली आहेत.
स्वामी विवेकानंद,स्वा सावरकर,डॉ हेडगेवार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विशेष अभ्यास विषय.या
महामानवांची जीवनचरित्रे तसेच रामायणावरील संगीत कार्यक्रमांचे संहितालेखन अडोणी यांनी केले आहे.
आई, हेचि दान देगा देवा ( विविध संतांचे पसायदान),दोन अश्वत्थामा,आम्ही पुत्र अमृताचे,जिब्रानच्या तीन
कथा, सत्तावन ते सुभाष, विज्ञानयोगी डॉ कलाम,संतांची समरसता,समन्वयाचार्य गुलाबराव महाराज, तया
सर्वात्मका ईश्वरा.. इत्यादी गाजलेले व्याख्यान विषय.
दै तरुण भारत,सकाळ,महाराष्ट्र टाइम्स ,सा. विवेक,लोकशाही वार्ता यातून अडोणी यांचे सामाजिक,राजकीय
विषयांवरील विविध लेख,स्तंभलेखन प्रकाशित झाले आहे.
दै. सकाळ मधील स्तंभ लेखन "आर्त अनावर" पुस्तकरुपाने प्रकाशित.या साहित्यकृतीला विविध पुरस्कार प्राप्त
झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास
गौरवग्रंथ 'पुत्र ज्ञानदेवतेचा' चे संपादन अडोणी यांनी केले आहे.
आशुतोष अडोणी कला क्षेत्रातील कुशल संघटक आहेत.विविध सांस्कृतिक,वाङ्मयीन उपक्रम,'अक्षरसाधना'साहित्य
संमेलन,अ.भा कलासाधक संगम,रंगधारा यात्रा आदी भव्य उपक्रमांचे संयोजन अडोणी यांनी केले आहे.
संस्कार भारती या कला व साहित्य क्षेत्रात कार्यरत अखिल भारतीय संस्थेचे विदर्भ प्रांत महामंत्री
म्हणून त्यांनी कार्य केले आहे.सध्या संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य विधा संयोजक म्हणून ते
कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,मुंबईचे सदस्य व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक
केंद्र,नागपूरच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
भारतीय जीवन बीमा निगम(LIC) मध्ये विकास अधिकारी या पदावर नागपूर येथे कार्यरत आशुतोष अडोणी उद्योजकता
विकास या विषयावरील मार्गदर्शक आहेत.
"मी कर्ता मी निर्माता","स्वप्न बघा-स्वप्न जगा","नापास मुलांची गोष्ट" या कार्यशाळांतून प्रेरक
व्याख्याता म्हणून ते सुपरिचित आहेत.